- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सुरेश तथा बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून पक्षाची निशाणी रिंगणाबाहेर गेली. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता भिवंडीकरांनी काँग्रेसला मतदान केले होते. केवळ भिवंडीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून भिवंडीपर्यंत (मुंबई वगळता) कोकण पट्ट्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत आता काँग्रेसचा उमेदवार नाही.
स्वातंत्र्यानंतर आधी डहाणू मतदारसंघात भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या असलेला परिसर समाविष्ट होता. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाला. १९६७ पासून ते २०१९ पर्यंत भिवंडीतील ज्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. त्यांना यावेळी काँग्रेसचे चिन्ह ईव्हीएममध्ये दिसणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. गुजरातच्या सीमेवरील तलासरी येथून सुरू होणारा हा मतदारसंघ कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटापर्यंत भौगोलिकदृष्ट्या पसरलेला होता. अशा या दऱ्याखोऱ्यातील ग्रामीण मतदारसंघात भिवंडी तालुक्याचा समावेश होता. या मतदारसंघावर १९६७ पासून काँग्रेसचा वरचष्मा राहिला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रभावामुळे दोन वेळा भाजपच्या उमेदवाराला येथे यश मिळवता आले होते.
या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार१९६७ - महाराज यशवंत मुकणे - काँग्रेस १९७१ - लक्ष्मण काकड्या दुमाडा - काँग्रेस१९७७ - लहानू कोम- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष१९८० - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९८४ - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९८९ - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९९१ - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९९६ - चिंतामण वनगा - भाजप१९९८ - शंकर नम - काँग्रेस१९९९ - चिंतामण वनगा - भाजप२००४ - दामोदर शिंगडा - काँग्रेस२००९ - सुरेश टावरे - काँग्रेस२०१४ - कपिल पाटील - भाजप२०१९ - कपिल पाटील - भाजप
५७ वर्षांत पहिल्यांदा...१९६७ ते २००४ अशा एकूण ११ लोकसभा निवडणुकांपैकी ८ वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार भिवंडीतून विजयी झाला. आता ५७ वर्षांमध्ये पहिल्यांदा काँग्रेसची निशाणी येथे नसेल.