भिवंडी - Congress Upset on Mahavikas Aghadi ( Marathi News ) महाविकास आघाडीतभिवंडी, सांगली आणि मुंबईतील जागेवरून मोठा वाद समोर आला आहे. भिवंडी आणि सांगली इथं परस्पर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. सांगलीतील काँग्रेस नेते नाराज असताना आता भिवंडीतही काँग्रेसचे प्रमुख नेते स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत.
आज कोकण पट्ट्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यात भिवंडी लोकसभेतील इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे हेदेखील होते. या बैठकीनंतर दयानंद चोरघे म्हणाले की, भिवंडी लोकसभा काँग्रेसनेच लढावी यासाठी माजी आमदार, ज्येष्ठ पदाधिकारी सगळेच एकत्र आले. राष्ट्रवादीनं या जागेवर उमेदवारी जाहीर केली. पण मविआच्या माध्यमातून ही उमेदवारी नाही. भिवंडीची जागा काँग्रेसची आहे. याठिकाणी आम्ही उमेदवार देणारच आहोत. काँग्रेसच्या चिन्हावरच ही निवडणूक लढू असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच गोवा ते सिंधुदुर्ग, पालघरपर्यंत सर्व कोकणातील कार्यकर्ते इथं आलेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भिवंडीच्या जागेवर काँग्रेस निवडणूक लढत आलीय. ही जागा आम्हाला मिळेल अशी खात्री आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे सर्व एकत्रितपणे भिवंडीवर तोडगा काढतील. काँग्रेसचा एबी फॉर्म आम्हाला देतील. याठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडणूक लढणार आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू असं दयानंद चोरघे यांनी म्हटलं.
दरम्यान, मविआची पालखी आम्ही मावळ, रत्नागिरी, रायगडसाठी उचलली आहे. आता तेच धंदे आम्हाला करायचे नाहीत. पैशावाल्याना तिकिट द्यायचं असेल तर कार्यकर्त्यांनी काम कशाला करायचं? आम्ही काँग्रेस वाढवण्यासाठी कशाला काम करतो, कशाला आम्ही ताकद दाखवतो. भिवंडी हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे हे आम्ही ठणकावून सांगतोय. भिवंडीची जागा न दिल्यास भिवंडीपासून कोकणातले सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिला आहे.