ठाणे : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत २३ लसीकरण केंद्रांवर शनिवारी (दि. २३) रात्री उशिरापर्यंत तब्बल दोन हजार ३६६ आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दररोज जितके लसीकरण करणे गरजेचे आहे, त्या तुलनेत कमी डोस देण्यात आल्याचे अहवालावरून दिसून आले. काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त लसीकरण झाल्याचेही आढळून आले आहे.
जिल्ह्यातील २३ लसीकरण केंद्रांवर आरोग्यसेवकांचे लसीकरण सुरू आहे. येथील सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच लसीकरण केंद्रांवर ५०० जणांचे लसीकरण आवश्यक होते. मात्र या केंद्रांवर दिवसभरात २८५ आरोग्यसेवकांचे लसीकरण झाले आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातील तीन केंद्रांवर ३०० जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते; पण अवघे १३४ जणांचे लसीकरण झाले. मीरा भाईंदर महापालिकेच्या तीन केंद्रांत ३०० डोस दिले जाणे अपेक्षित होते. मात्र दिवसभरात २७७ जणांचे लसीकरण झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या चार केंद्रांवर ४०० जणांना डोस दिले जाणे अपेक्षित होते. या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे सर्वाधिक ७७३ जणांचे लसीकरण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तीन केंद्रांवर ३०० जणांचे लसीकरण अपेक्षित होते. मात्र ३५४ जणांचे लसीकरण झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या चार केंद्रांवर सर्वच्या सर्व ४०० डोस देण्यात आले आहेत. याप्रमाणेच उल्हासनगरच्या एका केंद्रात १०० डोस देण्याचे नियोजन होते; पण या दिवशी १४३ जणांचे लसीकरण झालेले आढळून आले आहे.