नितीन पंडित, भिवंडी: शहरात कचरा समस्या गंभीर बनली असून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.शहरात ठिकठिकाणी साचलेल्या या कचऱ्याच्या ढिगार्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच शहरात अनेक ठिकाणी मनपा प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाणी समस्या देखील गंभीर झाली आहे.
अनेक ठिकाणी नळ पाईप लाईन नादुरुस्त असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.नागरिकांच्या या कचरा व पाणी समस्यांची दखल घेत मंगळवारी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या शिष्टमंडळासह मनपा प्रशासनावर धडक दिली. यावेळी आमदार रईस शेख यांनी शहरात साचलेल्या कचऱ्याच्या समस्येबद्दल मनपा आयुक्त अजय वैद्य तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना चांगलेच धारेवर धरले.
शहरातील कचरा उचळणाऱ्या ठेकेदाराकडून कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर किडे व दुर्गंधी पसरल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तर चावींद्रा डंपिंग ग्राऊंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने येथून पसरणाऱ्या दुर्गंधीने या परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.
या समस्येवर मनपा प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने अनेक वेळा नागरिकांकडून या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास नागरिकांकडून विरोध करण्यात येतो.तर कधी कचरा ठेकेदाराकडून घंटा गाडी ठेकेदारांना वेळेवर बिल मिळत नसल्याने घंटा गाडी चालक मालक अचानक कचरा उचलण्याचे काम बंद करत असल्याने शहरातील कचरा समस्या गंभीर बनली असून मनपा प्रशासन यातून मार्ग काढण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप देखील यावेळी आमदार रईस शेख यांनी यावेळी करत कचरा ठेकेदाराचे कंत्राट रद्द करून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना मनपा आयुक्त यांनी शहरातील कचरा समस्यां सोडविण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील असून एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार शेख यांना आयुक्त वैद्य यांनी दिले.
तर एका महिन्यात शहरातील कचरा समस्येवर मनपा प्रशासनाने उपाय योजना केली नाही तर एका महिन्यानंतर मनपा प्रशासनाविरोधात मुख्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल असा इशारा आमदार रईस शेख यांनी मनपा प्रशासनास दिला असून आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील मनपा आयुक्त वैद्य त्यांच्याकडे दिले आहे.