नितीन पंडित,भिवंडी: महाराष्ट्र निर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गळवी यांच्या वर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी मनोज गुळवी यांना दोन वर्षांकरिता ठाणे,रायगड,पालघर,मुंबई या चार जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानंतर मनसे सैनिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असताना या निर्णया विरोधात मनोज गुळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे याचिका दाखल केली होती.त्यावर नुकताच सुनावणी होऊन मनोज गुळवे यांची तडीपाडी रद्द करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत.
या आदेशा नंतर मनोज गुळवी यांचे भिवंडी शहरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भादवड येथे फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत केले आहे.मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी यांची तडीपार ही टोरंट पॉवर कंपनी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे झाली असल्याचा आरोप भिवंडीतील सर्वपक्षीय नेत्यांनी करत प्रांत अधिकारी कार्यालयावर काही दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. आपण सर्वसामान्य जनतेच्या न्यायाची लढाई लढत असून त्यास जनतेचा पाठिंबा असून या पुढे ही आपण जनसेवेसाठी कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया मनोज गुळवी यांनी दिली आहे.