रोहिदास पाटील
अनगाव - भिवंडी महानगर पालिकेत पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जून आणि जुलै या दोन महिन्याचा पगार मिळालेला नाही. कामगारांना तत्काळ पगार न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने भिवंडी मनपा आयुक्त अशोक रणखांब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागात बोरवेल पाइपलाईन निगा दूरूस्ती व वॉलमनच काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे म्हणून आंदोलने केल्यानंतर जूलै महिन्यात किमान वेतन मंजूर करण्यात आलं. कामगारांना किमान वेतनानूसार वेतनासह इतर सूविधा मिळाव्यात याकरिता 21 जूनला तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्यासोबत श्रमजीवी संघटनेच्या शिष्ठमंडळासोबत बैठक झाली. त्यावेळी कामगारांना किमान वेतन ओळखपत्रासह इतर सोयीसूविधा देण्याच्या सूचना आयूक्त मनोहर हिरे यांनी पाणीपूरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर ही सुविधा न मिळाल्याने पुन्हा मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिल्यानंतर आयूक्त अशोक रणखांब यांच्या सोबत ऑगस्टला पालिका सभागृहात शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली.
जुलै महिन्यांचा पगार व वॉलमनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कमी नकरता कामगारांना किमान वेतनानूसार त्यांचे वेतन आरटीजीस करून इतर सुविधा देण्याच्या सूचना पालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता गायकवाड शाखा अभियंता संदिप पटनावर यांना दिले. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता संबंधीत अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेली नाही. वॉलमनच काम करणाऱ्या काही कंत्राटी कामगारांना जूनचा पगार मिळालेला नाहीच. त्यांना व पाइपलाईन दूरूस्तीच काम करणाऱ्या कामगारांनाही जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही यासंबधी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र त्यानंतरही कामगारांचा जुलै महिन्याचा पगार मिळाला नसल्याने कामगारांना किमान वेतनानूसार वेतन मिळावे व संघटनेच्या कोणत्याही सभासद कामगाराला कमी न करता नवीन ठेक्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे तसे न केल्यास गणपती उत्सवापूर्वीच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे, श्रमजीवी कामगार संघटनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष अॅड रोहिदास पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. कामगारांकडे गणपतीची स्थापना करण्यात येते. मात्र पगारच मिळालेला नाही. ठेकेदार अधिकारी पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याने कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.