नितिन पंडीत -भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटन दृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे.
या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर अधिकारी व लोकप्रतिनिधी पाहत नाही ना अशी शंका निर्माण होते आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली असून येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू असा इशारा देखील ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे.