नितिन पंडीत -
भिवंडी (दि. २६) - पालिकेतील मृत कर्मचाऱ्याची प्रलंबित रक्कम वारस पत्नीस मिळवून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी कर्मचाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी केली. या घटनेनंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आनंद जगताप, असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. पालिकेचे कर्मचारी सिद्धार्थ मारुती घाडगे यांचा २९ मे २०२१ रोजी मृत्यू झाला. यानंतर, त्यांच्या पत्नी अस्मिता घाडगे यांनी भिवंडी पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज करून पतीच्या नावे असलेली ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, गट विमा व रजेचा पगार ही रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, मनपाच्या जुन्या मुख्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भविष्य निर्वाह निधी विभागातील प्रभारी कर्मचारी जगताप, याने मृत कर्मचाऱ्याचा भाऊ राहुल घाडगे यांच्याकडे धनादेश काढून देणेसाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.
यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन चार हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर, राहुल घाडगे यांनी ठाण्यातील लाचलुचपत विभागात तक्रार केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून चार हजार रुपयांची लाच घेताना आनंद जगताप यास रंगेहात पकडले. याप्रकरणी जबाब नोंदविला जात असून गुन्हाही नोंदविला जाणार आहे.