- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केली नसल्याने विरोधी पक्षनेता पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. महापालिकेला विरोधी पक्षनेता नसलेली महापालिका म्हणून भिवंडी महापालिका ठाणे जिल्ह्यातील किमान एकमेव महापालिका ठरली आहे . अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे सत्तेच्या चाव्या आल्या पासून महापालिकेतील विरोधी पक्षाची नेमणूक करतांना कोणार्क विकास आघाडीकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुरुवातीला मनपाचे विरोधी पक्षनेते पद भाजप कडे होते.
अडीच वर्षांच्या मुदतीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत महापालिकेत कोणार्क विकास आघाडीची सत्ता आली. ९० नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत एकट्या काँग्रेसचे ४७ नगरसेवक होते , मात्र त्यातील १८ नगरसेवकांनी कोणार्कला साथ दिल्याने या १८ नगरसेवकांवर काँग्रेसने कारवाई करत निलंबनाची मागणी केली त्यासंदर्भातील खटला सध्या कोकण आयुक्तांकडे सुरूच आहे. दरम्यान या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक झालेले खान मतलूब सरदार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद सोपविण्यात आले होते , त्यास काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेत नगरविकास मंत्री तथा पल्सकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरदार यांच्याविरोधी तक्रार केली . त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी सरदार यांची विरोधी पक्षाची नियुक्ती रद्द केली व कार्यालय देखील सील केले. मागील दिड ते दोन वर्षांपासून मनपात विरोधी पक्षनेताच नाही . ज्याचा पद्धतशीर फायदा सत्ताधारी कोणार्क विकास आघाडी घेत आहे. विशेष म्हणजे राजकारण्यांच्या महापालिकेतील राजकीय खिचडीचा परिणाम शहर विकासावर होत आहे . एककेंद्री सत्ता असल्याने पालिकेत मनमानी कारभार चालत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत.
भिवंडी महापालिकेत विरोधी पक्षनेता नसल्याने महापालिकेत हिटलरशाही सुरु असून हम करे सो कायदा अशा प्रकारची मनमानी महापालिकेत सुरु आहे ज्याचा परिणाम शहर विकासावर होत असून सध्या विकास करण्यापेक्षा कंत्राटदारांचे राज्य महापालिकेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदावरून नगरसेवकांमध्ये राजकीय वाद सुरु असून विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापौरांना आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे .