- नितीन पंडितभिवंडी - मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात आयुक्तांकडे तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनपा प्रशासनासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी भिवंडी महापालिकेच्या मुख्यालय प्रवेशद्वारावर भारतीय कामगार कर्मचारी महासंघ भिवंडी युनिटचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यानी एक दिवसीय उपोषण आंदोलन केले असुन या आंदोलनास राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे.या वेळी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी बेकायदेशीरपणे होणाऱ्या बदल्या तातडीने थांबवाव्यात आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सेवा ज्येष्ठता डावलून कनिष्ठ लिपीकांना दिलेली प्रभारी पदे तात्काळ रद्द करावी व सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे.निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम त्याच दिवशी तात्काळ देण्यात यावी.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरपट्टी भरण्याची अट रद्द करावी.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ पेन्शन चालू करावी. मनपा कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांची बारा,चोवीस ची प्रकरणे व सेवानिवृत्त कर्मचारी यांची सहावा वेतन माहे एप्रिल २०११ ते ऑक्टोंबर २०१२ या कालावधीतील १९ महिन्यांची फरकाची रक्कम तात्काळ अदा करावी. दिवाळीपूर्वी दिवाळी सानूग्रह अनुदान मिळालेच पाहीजे.सेवानिवृत्त कर्मचारी यांची बारा चोवीस करीता जात पडताळणीची जाचक अट तात्काळ रद्द करावी अशा विविध मागण्याचे निवेदन आयुक्त अजय वैद्य यांना सादर करण्यात आले आहे.
भिवंडी महापालिकेत गेल्या अनेक वर्षे नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता त्यांना डावलून पालिका प्रशासन वशिला बाजी व मनमानी करून आस्थापना विभागातून अर्थ कारण करून नियुक्त आदेश काढत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या बाबत प्रशासनाकडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत आहे.या कडे राज्य शासन व आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ भिवंडी युनिट चे अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे,यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण आयोजित करण्यात आले होते,यावेळी माजी सभापती प्रदिप राका,रवी मदन,विवेक मालसे,रतन चव्हाण,मारूती जाधव,सिद्धीक फक्की,इरफान पटेल,रमेश गायकवाड यांच्या सह शेकडो सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पाठिंबा दिला.