भिवंडी - गुरचरण जागेच्या कब्जावरून झालेल्या वादातून पंचायत समिती सभापतींच्या पतीने दलित तरुणास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कवाड गावात रविवारी घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा सभापतीच्या पतीसह इतर ९ जणांवर तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसीटीसह इतर कलमांन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असतांनाही घटनेच्या सहा दिवसांनंतरही तालुका पोलोसांनी आरोपीस अटक केलेली नसल्याने, दलित तारुणांसह त्याचे संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे.
श्रीकांत नारायण भोईर ( वय ४० वर्ष रा. कवाड ) असे मारहाण झालेल्या दलित तरुणाचे नाव असून निलेश गुरुनाथ गुरव, असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. कवाड हद्दीतील गुरचरणमधील काही भागातील पडीक जमीन श्रीकांत भोईर याच्या कब्जा वहीवाटीस असून याठिकाणी सिमेंटचे खांब पुरण्याचे काम रविवारी सुरू होते यावेळी कवाड गावात राहणारे निलेश गुरव व त्याचे साथीदार जगदीश हाडके, बंटी पवार, चिन्मय कुंदेकर, यशवंत गुरव, गोविंद गुंजे, आकाश जाधव, दीपक जाधव, ललित भैय्या, असे नऊ आरोपी यांनी भोईर यांनी कब्जा जमिनीवर टाकलेले सिमेंट खांब पडून टाकले यावेळी झालेल्या वादात निलेश गुरव व त्याच्या साथीदारांनी श्रीकांत यास ठोशा बुक्यांनी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत श्रीकांत जखमी झाला असून या मारहाणीची घटना शेजारील दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुरव व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सहा दिवसांनंतरही आरोपी मोकाट असून पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
निलेश गुरव हा भिवंडी पंचायत समिती सभापतींचा पती असून भाजपचा कार्यकर्ता असल्याने राजकीय वरदहस्तामुळेच त्याला अटक करण्यात येत नसल्याची प्रतिक्रिया श्रीकांत भोईर यांनी लोकमतशी बोलताना दिली.