- पंढरीनाथ कुंभारमागील आठवड्यात गायत्रीनगर परिसरात लग्न झालेल्या एका तरुणासोबतचे अनैतिक संबंध टिकवण्यासाठी त्याच्या नव्या प्रेयसीचा काटा काढण्यासाठी एका महिलेने त्या प्रेयसीला आपल्या घरी बोलवून तिला गुंगीचे औषध दिले. बेशुद्धावस्थेत तिच्यावर ओळखीच्या व्यक्तीला अत्याचार करण्यास भाग पाडले. मोबाइलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या पीडित तरुणीकडून खंडणी वसूल केली. या व अशा अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे.यंत्रमागावर काम करण्यासाठी देशातील विविध भागांतून कामगार व मजूर मोठ्या संख्येने भिवंडीत आले असून ते झोपडपट्टीत राहत आहेत. त्यामुळे सरकारी जागेवर मोठ्या संख्येने झोपडपट्टी वसलेली आहे. शांतीनगर-गायत्रीनगर, कल्याण रोडवर नवीवस्ती व नेहरूनगर, कामतघर येथे ताडाली ते फेणेपाडा, अजमेरनगर, नारपोली साठेनगर, अंजूरफाटा, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी, रामेश्वर मंदिर तलाव, इंदिरा गांधी रुग्णालय ते वेताळपाडा अशा विविध ठिकाणी झोपडपट्टी आहे. परप्रांतांतून आलेले कामगार आपली व कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. कुटुंबापासून दूर राहणाऱ्या अशा कामगारांकडून काही अल्पवयीन मुलींना फूस लावण्याच्या प्रकारात गेल्या दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. संस्कारांचा अभाव, माध्यमांचा पगडा, मोबाइलमधून येणारी खरीखोटी माहिती किंवा ऐहिक सुखाची लालसा त्यातून हे प्रकार घडत आहेत. अशा घटनांमधील मुली, तरुणींची फसवणूक होते. काहींना देहविक्रयाकरिता विकण्यापर्यंत घटना घडल्याचे उघड झाले आहे. अशा वरचेवर घडणाºया घटनांमुळे पालकवर्ग भीतीग्रस्त आहे. घरांतून पळून जाणाºया मुली गरिबी व कौटुंबिक कलहाच्या वातावरणाला कंटाळून पळून जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींची काळजी घ्यावी, असे जाहीर आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.परप्रांतांतून येथे विवाह होऊन आलेल्या तरुणींची स्थिती वेगळी नाही. किरकोळ कारणास्तव किंवा चारित्र्याच्या संशयावरून त्यांना मारहाण करणे, जीव घेणे असे प्रकार घडतात. त्यांचे माहेर दूर असल्याने आपल्या मुलीची किंवा बहिणीची काय अवस्था आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. समजा, ती छळ सहन करत असल्याचे कळले तरी सासरी दिलेल्या मुलीने हा छळ सहन केलाच पाहिजे, अशी अनेकांची भावना असते. त्यातून हे घडते.कॉलेज तरुणीपासून ते गृहिणीच्या विनयभंगाच्या तक्रारी वाढल्या आहेत. विनयभंगाच्या घटना केवळ झोपडपट्टीत होतात, असे नाही तर सुशिक्षित तरुणी व महिलांना चांगल्या वस्त्यांमध्येही हाच अनुभव येत आहे. ग्रामीण भागातही अशा तक्रारी वाढल्या आहेत.भिवंडी शहर व ग्रामीण भागात फोफावलेले लॉजेस हे येथील अनैतिक धंद्याचे द्योतक आहे. पोलीस या लॉजवर धाडी घालून तेथे अनैतिक धंद्यांकरिता आलेल्या ग्राहकांना पकडतात. मात्र, लॉजच्या मालकावर किंवा निदान व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून कारवाई करत नाहीत. पूर्वी प्रांत कार्यालय व स्थानिक पोलीस लॉज व्यवसायावर लक्ष ठेवत होते. परंतु हा विषय जिल्हा पोलीस आयुक्तालयाकडे सुपूर्द केल्यामुळे त्याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत आहेत. वेश्या व्यवसाय फोफावल्यामुळे सेक्सशी संबंधित आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
भिवंडीची वाटचाल सेक्स क्राइम कॅपिटलकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 3:07 AM