भिवंडी:
दि.६-सध्या राज्यात विचित्र राजकीय परिस्थिती असून कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांना पक्षात आणले जात आहे.शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हा आमचाच होता,राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष होता, मात्र गोदामांवरील कारवाईची भीती दाखवून त्याच्यावर राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली. त्यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच माझ्याकडे निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यास सांगितले असा गौप्य स्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चा प्रसंगी केला.
आव्हाडांच्या या राजकीय गौप्य स्फोटाने भिवंडीतील राजकारण चांगलेच ढवळले आहे.आव्हाडांच्या या भाषणाची क्लिप भिवंडीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.विशेष म्हणजे आव्हाडांच्या या वक्तव्याची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संदर्भात सुरेश म्हात्रे यांना विचारणा झाली असल्याची माहिती बाळ्या मामा यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या व्यासपीठावरून आव्हाडांनी आपले मत व्यक्त करतांना कार्यकर्त्यांवर कशा प्रकारे दबाव आणला जातो,हे सांगताना शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचे उदाहरण दिले.बाळ्या मामा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते, भिवंडी लोकसभेचे खासदार व सध्या केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय शत्रू म्हणून बाळ्यामामा ओळखले जातात. भिवंडी लोकसभेत भाजपचे मंत्री असलेल्या पाटलांना लोकसभा निवडणुकीत केवळ बाळ्या मामा हे एकमेव विरोधक असल्याने बाळ्या मामा यांना शिंदे गटात घेतले तर भाजपसाठी ते फायदेशीर ठरणार यासाठी बाळ्या मामांवर दबाव आणला अशी चर्चा बाळ्या मामा यांच्या शिंदे गटात प्रवेश करताना जिल्हाभर झाली होती.त्यानंतर ठाणे येथील जाहीर सभेत आव्हाडांनी बाळ्या मामा यांच्यावरची कारवाई थांबावी म्हणून शरद पवार यांनी माझ्याकडेच निरोप पाठवून बाळ्या मामा यांना शिंदे गटात जाण्यासाठी सांगितले असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.आव्हाडांच्या या गौप्यस्फोटामुळे भिवंडीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून आमचा बाळ्या मामा या आव्हाडांच्या विधानामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे असल्याने मंत्री कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीतील राजकीय धोका अजूनही टळला नसल्याचे आव्हाडांच्या वक्तव्याने अधोरेखित झाले आहे.त्यामुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात आव्हाडांच्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.