भिवंडी : पुणे व भिवंडी परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आठ आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २५ लाखाचे ७०० ग्रॅम सोन्याचे व १९ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.कामतघर-ताडाळी जकात नाका येथे दोन सराईत घरफोडी करणारे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या व ठाणे येथील वागळे इस्टेटच्या पोलिसांना मिळाली होती. सापळा लावला असता पांढºया रंगाची गोणी घेऊन दोन व्यक्ती बोलत उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता गोणी घेतलेल्या व्यक्तीने पळ काढला तर दुसºयाला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या अंगझडतीत ५०७.०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर गोणीमध्ये १८.३८६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले.या दागिन्यांची चोरी त्यांनी पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याचे कबूल केले. तर जळगाव पोलिसांकडील तपासात अटक केलेल्या कुंदनसिंग जग्गी याने भिवंडीत देखील घरफोड्या केल्याचे सांगितल्याने त्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन सात घरफोडी उघडकीस आणल्या. त्याच्याकडून ३ लाख ९ हजार ५०० रूपयांचे २०० ग्राम सोन्याचे व ५०० ग्राम चांदीचे दागिने जप्त केले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने एकूण आठ आरोपींना ताब्यात घेतले आहेत.
भिवंडी, पुण्यात घरफोडी करणा-यांना अटक, २५ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:04 AM