- नितिन पंडीत
भिवंडी ( दि. २१ ) मंगळवारी उसंत दिलेल्या पावसाने बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर रस्त्यांवर पाणी साचल्याने शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
भिवंडीतील धामणकर नाका , कमला हॉटेल, कल्याणनाका , नदी नाका, ईदगाह , भाजी मार्केट , गुलझार नगर आदी भागात पाणी साचले होते. तर अंजुरफाटा कल्याण नाका या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यावर वाहन चालवितांना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. त्याचबरोबर सकाळी सकाळी रस्त्यावर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे देखील मोठे हाल झाले.
भिवंडी ठाणे रस्त्या वरील पूर्णा तसेच राहनाल येथे रस्त्यावर पाणी साचल्याने या ठिकाणी काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तर अंजुरफाटा माजकोली चिंचोटी या मार्गावर मानकोली , दापोडा तसेच नारपोली बहात्तर गाळा या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. तर भिवंडी वाडा महामार्गावर नदी नाका, मिठापाडा परिसरात येथे पाणी साचल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना रस्त्यावरून गुढघाभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लावला. तर दर्गारोड कारीवली रस्त्यावर देखील पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.
कल्याण नाका परिसरात पाणी भरल्याने साचलेले पाणी थेट व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने येथील व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. दुकानातील पाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. तर ईदगा परिसरातील नदी किनारी असलेल्या झोपड्यांमध्येपावसाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांचेमोठे हाल व नुकसान झाले. तर तीनबत्ती निजामपुरा भाजी मार्केटमध्ये देखील पाणी शिरल्याने भाजी मार्केटला नदीचेस्वरूपआले होते. त्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांचे प्रचंड हाल झाले.