- नितीन पंडितभिवंडी - शहरात सातत्याने कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठयाचा सपाचे आमदार रईस शेख यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर स्टेम कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीची चौकशी करून हकालपट्टी करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेस शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र मागील ६ महिन्यांपासून भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.याबाबत आमदार रईस शेख यांनी स्टेम अधिकाऱी प्रथमेश पाटील व ऋषिकेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारपुस केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची योग्य उत्तर मिळाले नाही.त्यातच शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार स्टेम कंपनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील जल शुद्धीकरण मशिनची देखभाल दुरूस्ती बऱ्याच वर्षांपासुन झाली नसून अनेक मशीन बंद व नादुरुस्त असल्याने भिवंडी शहरास पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची बाब आमदार शेख यांना समजली असून स्टेममध्ये नियुक्त केलेले अभियंते महेश भोये व अवंतिका शिंदे यांना जलशुद्धीकरण केंद्राचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसुन त्यांच्यावर महाव्यवस्थापक अनिल चौधरी व व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप देखील आमदार शेख यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
आमदार शेख यांनी केलेल्या चौकशीत, पंपाची देखभाल दुरूस्ती कामाबाबत फक्त बिले काढण्याची कामे या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून भिवंडी शहरातून महिन्याभरात ३ कोटी ५० लाख रूपये पाणी देयक भरूनसुद्धा शहराचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.
दरम्यान स्टेम कंपनीचे संकेत घरत हे व्यवस्थापकीय संचालक या पदासाठी पात्र नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या अनुभवहीन कार्यपद्धतीमूळे स्टेम कंपनीचे नुकसान होत असुन विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याचा फटका भिवंडी शहरातील लोकांना सोसावा लागत असून भिवंडी शहरात पाणीसमास्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व यास पूर्णत: स्टेम कंपनीचे संकेत घरत जबाबदार राहतील.त्यामुळे अवैधरित्या नियुक्त झालेल्या संकेत घरत यांच्या नियुक्तीची चौकशी करुन त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.