भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत परदेशातील वापरलेले एन ९७ मास्क फेकल्याचे प्रकरण करोना काळात मागील वर्षी उघडकीस आले असतानाच, पुन्हा एकदा याच ठिकाणी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावर ओषध साठा कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे.
विशेष म्हणजे या सर्व औषध साठ्याची वापरण्याची मुदत अजून संपलेली नसून या मध्ये हरियाणा सरकार साठी बनविलेल्या औषधांचा सुद्धा समावेश आहे तर काही औषध गोळ्या या डॉक्टर मंडळींना देण्यासाठी बनविलेली सॅम्पल पाकिटे सुद्धा या कचऱ्यात फेकलेल्या आहेत .या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनांसह आरोग्य यंत्रणेचे कोणतेही लक्ष नसून ही कचऱ्यात फेकलेली औषधे कोणी उचलून नेत त्याचा वापर करून दुरुपयोग केल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे . त्याच बरोबर हि औषधें नेमकी कोणी व का फेकली याचा शोध घेणमे गरजेचे झाले आहे .
दरम्यान या प्रकाराबाबत ठाणे जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदर बाब गंभीर स्वरूपाची असून या बाबत चौकशी होऊन सदरचा औषध साठा कचऱ्यात फेकणाऱ्यास शोधून काढून कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली .