ठाणे : केंद्रीय दूरसंचार विभागाच्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) निरीक्षण युनिटने ठाणे भिवंडी आणि पिंपळा भागातून ३८ बूस्टर आणि ५५ फिडर जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील बेकायदेशीर रिपीट आणि बूस्टरमुळे दूरसंचार नेटवर्क्सवर वारंवार कॉल ड्रॉप होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे दूरसंचार विभागाच्या एका विशेष पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे प्रभारी अधिकारी अमित गौतम (आयईएस, डब्ल्यूएमओ मुंबई, इन्स्पेक्शन इनचार्ज, महाराष्ट्र), गजेंद्र मेवारा, कैलाशनाथ आणि आर.एन. लहाडके यांच्या पथकाने भिवंडी आणि पिंपळा भागात १८ आणि २० फेब्रुवारी रोजी रोजी छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये दूरध्वनीसाठी लागणारे ३८ बूस्टर, तसेच ५५ फीडर वायरचे जोड कापून निष्क्रिय केले. या भागातील ग्राहकांना मोबाइलच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय येणे, तसेच बेकायदेशीर रीपिटर आणि बूस्टरमुळे दूरसंचार नेटवर्क्सवर कॉल ड्रॉप होणे आणि डेटा सर्फिंग वेग कमी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे गोपनीय माहितीच्या, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर या पथकाने ही कारवाई केली. त्याचबरोबर, भिवंडी आणि पिंपळा भागातील इतरही १४ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
या व्यतिरिक्त मोबाइल नेटवर्क बूस्टर खराब सेवा गुणवत्तेचे प्रमुख कारण बनल्यामुळे, दूरसंचार विभागाने (डीओटी) पूर्वी ई-कॉमर्स वेबसाइट्सना मोबाइल सिग्नल बूस्टरची यादी मागे घेण्यास सांगितले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
* एखाद्या नामांकित मोबाइल नेटवर्क कंपनीच्या कॉल्समध्ये, तसेच इंटरनेट स्पीडमध्ये या बेकायदेशीर बूस्टरद्वारे परिणाम होत होता. त्यातून अन्य एखाद्या कंपनीचा स्पीड वाढविला जाण्यासाठी मदत केली जात असल्याचे या धाडीच्या तपासामध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.