भिवंडी : राहुल गांधींवरील याचिकेवर पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:35 PM2022-02-05T19:35:17+5:302022-02-05T19:35:43+5:30
राहुल गांधींनी आरएसएसवर केलेल्या आरोपामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे म्हणत भिवंडी न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली होती.
भिवंडी : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीन्यायालयात सुरु असलेल्या अवमान याचिकेची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केले होते.
गांधी यांनी आरएसएसवर केलेल्या या आरोपामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे भिवंडीतील कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शनिवारी जलदगती न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती.
या सुनावणी वेळी तक्रारदारातर्फे अॅड. प्रबोध जयवंत यांनी याचिकाकर्ते राजेश कुंटे काही कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज सादर करून पुढील सुनावणीची तारखेची मागणी केली. तर राहुल गांधींचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनीही खासदार राहुल गांधी हे गोवा, उत्तरप्रदेशसह इतर राज्यात सुरु असलेल्या निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने ते न्ययालयात हजर राहू शकत नाही असा अर्ज न्ययालयात सादर करून पुढील तारखेची मागणी केली. दोन्ही वकिलांच्या अर्जावर सुनावणी होऊन जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश जे व्ही पालीवाल यांनी पुढील सुनावणीची तारीख १० फेब्रुवारी दिली आहे.