भिवंडी: तालुक्यातील पाये , नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (24) व भिमा भोईर ( 22 ) या दोघा भावांना खार्डी गावातील निलेश तांगडी या मालकाने आपल्या सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात पिडीत तरुणांनी श्रमजिवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989 कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
मालक निलेश तांगडी यांनी पिडीत तरुणांच्या 29 मे 2018 रोजी झालेल्या लग्न सोहळ्यासाठी 1 लाख 19 हजार 690 रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने एका कागदावर लिहून दिले होते.त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांनी दोघा भावांनी मालक निलेश तांगडी यांच्या मालकीच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. यावेळी प्रत्येकी 3 हजार 500 रुपये महिना वेतन देण्याचे निश्चित करून आठवड्याला प्रत्येकी 1 हजार रुपये दोघांना देण्याचे ठरवण्यात आले होते.तर दोघा भावांना घरी येण्या - जाण्यासाठी हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्तेही दर महिन्याला दोघांच्या पगारातून कपात केले जायचे.
कागदावर लग्नाचा खर्च लिहून दिल्यापासून दोन वर्षात आजपर्यंत दोघांचा हिशेब केलेला नव्हता.सर्व्हिस सेंटरवर काम नसले की मालक निलेश तांगडी त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा.सध्या कोरोनाच्या काळात काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. यावेळी निलेश तांगडी यांनी दोघा भावांना फोनवरून तसेच घरी येऊन आवणीच्या कामाला चला असा तगादा लावला होता. त्यावेळी घरच्या शेतीचे काम आटोपून आम्हीं कामावर येतो असे सांगितले.मात्र मालक निलेश हा काही ऐकत नव्हता.त्यामुळे दोघा भावांनी शेठ निलेश यास दोन वर्षे काम केल्याचा हिशोब करण्यास सांगितले.याचा राग मनात ठेवून निलेश तांगडी यांनी दोघा भावांना शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच माझे व्याजासहीत 3 लाख रुपये तुमच्या अंगावर झाले आहेत.ते एका महिन्यात मला परत द्या असे धमकावले.यामुळे राजेश व भिमा यांचे कुटुंब घाबरून अस्वस्थ झाले होते.अखेर या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला.पिडीत तरुणांच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन बाळाराम भोईर यांनी भिवंडी तालुक्याच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री उशिराने वेठबिगार मुक्ती व ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना दिली असता त्यांनी श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पिडीत राजेश व भीमा भोईर या दोघा भावांना कार्यालयात पाचारण करुन त्यांना वेठबिगार मुक्तीचे दाखले देऊन बंध मुक्त केले आहे.यावेळी भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक,सचिव मोतीराम नामकुडा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर,ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे,ठाणे जिल्हा शेतकरी घटक प्रमुख संगिता भोमटे,ठाणे जिल्हा महिला घटक प्रमुख जया पारधी,भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनिल लोणे,भिवंडी ग्रामीण तालुका उपाध्यक्ष केशव पारधी, कातकरी घटक प्रमुख गुरुनाथ वाघे,भिवंडी शहर उपप्रमुख महेंद्र निरगुडा, युवक उपप्रमुख किशोर हुमणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या घटनेप्रकरणी मालक निलेश तांगडी याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात बंधबिगार पद्धती (उच्चाटन )अधिनियम 1976 कलम 15 , 16 , 17 , 18 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1989 कलम 3(1)(एच ) व 6 या कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास गणेशपुरी पोलिस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.