भिवंडी - भिवंडीत बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम असल्याने सकाळी शहरातील निजामपुरा तीनबत्ती परिसरातील भाजी मार्केट पाण्याखाली गेल्याने भाजीविक्रेत्यांसह भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. या परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली होती.
या परिसरात महापालिकेच्या वतीने गटार नियोजन व्यवस्थित केले नसल्याने गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना या पाण्याचा मोठा त्रास होत असून साचलेले पाणी नागरिकांच्या घरातील नळांमध्ये जात असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असतो.त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने या साचणाऱ्या पाण्याकडे व नागरिकांना होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शासनाने शहरात निवडणुका न घेता मनपा प्रशासन शासनाने ताब्यात घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.