भिवंडी : भिवंडीतील नागरिकांची वाहतूककोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने येथील नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मात्र, वाहतूक विभागासह पालिका प्रशासन या कोंडीतून नागरिकांची सुटका का करत नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
यंत्रमाग व गोदामपट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत वाहनांची सतत येजा सुरू असते. मात्र, येथील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूककोंडी होत असते. सुरुवातीला महामार्गांवर उड्डाणपुलाच्या कामांमुळे होणारी कोंडी उड्डाणपूल सुरू झाल्याने संपली असतानाच आता महामार्गांवर दुरुस्तीमुळे कोंडी होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे सध्या शहरात अंजूरफाटा ते कल्याणनाका रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे व अतिक्रमणे हटवली नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे या मार्गावर कोंडी होते. कल्याणनाका ते महापालिका मुख्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. विशेष म्हणजे हे काम करताना पालिका प्रशासन व वाहतूक विभागाचे कोणतेही तारतम्य दिसत नाही. दहा मिनिटांच्या अंतरासाठी दीड ते दोन तास लागत असल्याने चालकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. याच परिसरात भिवंडी पंचायत समिती, तहसीलदार, पालिका कार्यालय, टपाल कार्यालय, न्यायालय, तालुका पोलीस ठाणे व सब जेल व बसस्थानकासह अन्य सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. सध्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कोंडी होत आहे.
बस पार्किंगचा त्रासभिवंडीतील धामणकरनाका ते कॉलेज रोड या नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर मागील पाच ते सहा महिन्यांपासून किमान चार ते पाच खाजगी प्रवासी बस बेकायदा उभ्या करून ठेवल्या जात असून त्यामुळे या ठिकाणी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजपचे शहर सरचिटणीस विशाल पाठारे यांनी निवेदनात केला आहे. या बस एकाच ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा असल्याप्रमाणे उभ्या करून ठेवतात. परिणामी, साफसफाई करण्यास अडचण येत असल्याने या भागात अस्वच्छता पसरून दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे या बसवर योग्य ती कारवाई करून त्वरित हटवाव्यात, अशी मागणी पाठारे यांनी केली आहे.