भिवंडी:- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असल्याने ३१ मार्च पासून भिवंडी शहरात महिना भर पंधरा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.ऐन उन्हाळ्यात पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांवर पाणी कपातीचे संकट ओढवले असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन भिवंडी मनपा पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.
भिवंडी शहराला सध्या ११५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यापैकी ७३ एमएलडी पाणी पुरवठा स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी शहराला होत असून ४० एमएलडी पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून होत आहे. तर शहरातील वऱ्हाळा देवी तलावातून दोन एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत आहे.सध्या मुस्लिम बांधवांचा रमझान महिना सुरु असून ऐन सणात पाणी कपातीच्या संकटाला शहरवासीयांना सामोरे जावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शहरत काही भागात अगोदरच अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याने आता पाणी कपातीच्या संकटामुळे शहरतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार असल्याने मनपा प्रशासन त्यातून कसा मार्ग काढणार याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.