काल्हेर : येथील गोदामांना आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतानाच शनिवारी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंदवली येथील एका लेबल बनवणाऱ्या कंपनीला शनिवारी आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. राजू अजित सिंग, डबरू उर्फ राकेश अजित सिंग अशी त्यांची नावे असून त्यांना नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.गुंदवली ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन लॉजिस्टीक येथे असलेल्या लिओन लेबल कंपनीला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी भिवंडीसह परिसरातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या कंपनीत प्रिंटिंग प्रेसचे काम होते. या कामासाठी लागणाऱ्या रसायनांची साठवणूक करून ठेवली होती. मात्र, आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दुपारी तीन वाजता ही आग आटोक्यात आली. प्लॉस्टीकवर प्रिंट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोलेंट नावाच्या केमिकलमुळे ही लागल्याचा अंदाज आहे. भिवंडीतील दोन, ठाणे आणि कल्याण येथील प्रत्येकी एका टँकरद्वारे ही आग विझवण्यात आली. (वार्ताहर)
भिवंडीत कंपनीला आग लागून दोघे जखमी
By admin | Published: October 30, 2016 12:25 AM