भिवंडीत कुणबी आणि मुस्लीम मतदारांच्या हाती निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 05:12 AM2019-04-23T05:12:51+5:302019-04-23T05:13:19+5:30

बंडखोर थंडावले; मित्रपक्षाची साथ कशी मिळते, यावर भाजप, काँग्रेसची भिस्त

Bhiwandit Kunbi and Muslim voters | भिवंडीत कुणबी आणि मुस्लीम मतदारांच्या हाती निकाल

भिवंडीत कुणबी आणि मुस्लीम मतदारांच्या हाती निकाल

Next

- पंढरीनाथ कुंभार

भिवंडी लोकसभा मतदारसंघात अगोदर विश्वनाथ पाटील व सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे निवडणुकीत रंग भरला गेला. त्यानंतर, दोघांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्यावर आता चर्चा आहे ती कुणबी आणि मुस्लिम मते कुणाकडे वळणार? कारण, हीच मते भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांचे भवितव्य ठरवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उच्चविद्याविभूषित उमेदवार डॉ. अरुण सावंत व समाजवादी पक्षाचे डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांच्या उमेदवारीचा फटका कुणाला बसणार, याचेही कुतूहल निर्माण झाले आहे.

भाजपचे कपिल पाटील व काँग्रेसचे सुरेश टावरे हे दोघे आगरी समाजाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण सावंत हे कुणबी समाजाचे आहेत, तर समाजवादीचे डॉ. नुरुद्दीन अन्सारी हे मुस्लिम आहेत. या मतदारसंघात कुणबी समाजाची सहा लाख ८० हजार, मुस्लिम समाजाची तीन लाख ८१ हजार, आगरी समाजाची तीन लाख १७ हजार, इतर समाजांची दोन लाख ६४ हजार मते आहेत.
दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आगरी समाजाचे असल्याने या मतांचे विभाजन अटळ आहे. त्यामुळे आता कुणबी मते कुणाला किती मिळतात आणि मुस्लिम मते कोणत्या पक्षाकडे वळतात, हाच कळीचा मुद्दा असेल.

कपिल पाटील व बंडखोर सेना नेते सुरेश म्हात्रे यांच्यात भिवंडीतील गोदामांच्या अर्थकारणावरून संघर्ष सुरू आहे. भिवंडीतील शिवसैनिक पाटील यांच्यावर सुरुवातीला नाराज होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नाराजी दूर करण्याकरिता बरेच प्रयत्न केले. कुणबी नेते विश्वनाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिल्याने ती पाटील यांच्याकरिता जमेची बाजू आहे. पाटील यांचा या मतदारसंघातील लाखभर कुणबी मतांवर प्रभाव आहे.

कुणबी समाजाचे उमेदवार असलेले डॉ. अरुण सावंत हे मतदारसंघात फारसे परिचित नाहीत. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करत आहेत. या मतदारसंघात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने आहेत. भोजपुरी अभिनेता व भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी उत्तर भारतीय मतांकरिता येथे प्रचार केला.

माणकोली व रांजनोली उड्डाणपुलांची मंजूर कामे पाच वर्षांत पूर्ण झालेली नाहीत. दुर्गाडी किल्ल्याजवळील पुलाची घोषणा करून तीन वर्षे उलटले, तरी पूर्ण झाले नाही. वासिंद रेल्वेवर उड्डाणपूल बांधण्याकरिता भूमिपूजन झाले, पण अडीच वर्षांत एक पोलही उभा राहिला नाही.
- सुरेश टावरे, काँग्रेस

२८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठपदरी वडपे-माजिवडा बायपास, भिवंडीत पासपोर्ट आॅफिस, भिवंडीतील काँक्रिट रस्ते, कल्याण-मुरबाड रेल्वेचे भूमिपूजन आदी महत्त्वपूर्ण कामे मंजूर झाली. गेल्या ५५ वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणावर कामे झाली.
- कपिल पाटील, भाजप

कळीचे मुद्दे
भिवंडीतील यंत्रमाग उद्योगास स्थैर्य नाही, भिवंडीतील टोरंट पॉवर कंपनीविरुद्ध तक्रारी.
शासनाच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या दरातील तफावतीने शेतकरी असंतुष्ट. भिवंडी रोड स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल.

Web Title: Bhiwandit Kunbi and Muslim voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.