मीरारोड - दूरचित्रवाहिनी मालिका आणि भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या कलाकार अनुपमा पाठक ( 40) यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत पाठकने दोन कारणांनी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. अनुपमा ह्या काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील ठाकूर मॉलसमोर एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरात त्या राहत होत्या. रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दोन कारणे दिली आहेत.
मनीष झा याने अनुपमा यांची दुचाकी मे महिन्यात त्या गावी गेल्या असता वापरण्यास नेली होती. परंतु अनुपमा परत आल्यानंतर मात्र मनीष त्यांची दुचाकी परत करत नव्हता. तर एका परिचिताचे 10 हजार रुपये अनुपमा यांनी मालाडच्या विस्डम प्रोड्युसर कंपनीमध्ये गुंतवले होते. त्याची मुदत डिसेंबर 2019 रोजीच पूर्ण झालेली असताना कंपनीने पैसे परत करण्यास चालढकल चालवली होती असे चिठ्ठीत म्हटले आहे. अनुपमा यांनी 1 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री आपला 10 मिनिटांचा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला होता. त्यामध्ये देखील त्यांनी स्वतःला आलेला वाईट अनुभव कथन करत कोणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. त्यांनी आपल्या वेदना व्यक्त करत मृत्यू झाल्यावर काय काय बोलले जाते हे मांडले होते. लोकांवरचा विश्वास उडून गेल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान अनुपमा यांच्या आत्महत्येप्रकरणी मिळालेल्या चिठ्ठी नुसार काशिमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.