नितीन पंडितभिवंडी: शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बसली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा ठेकेदाराचा ठेका रद्द झाल्याने महापालिकेने नवीन कचरा उचलण्यासाठी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे मात्र ठेकेदार नियुक्त झाला नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
भिवंडी शहर संवेदनशील शहर असून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शहरात राहत आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना मंगळवार पासून सुरू झाला आहे मात्र अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.
शहरातील चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडबरोबरच शहराच्या मध्यभागी असलेल्या खडक रोड परिसरात सुरू केलेला डंपिंग ग्राउंडची समस्या अत्यंत गंभीर बनली असून खडक रोड परिसरातील डम्पिंग ग्राउंड नागरी वस्तीच्या मधोमध आहे.येथे कचरा संकलन होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यातच आता या डंपिंग ग्राउंडला आगी लग्नाच्या घटना शहरात रोज घडत आहेत त्यामुळे खडक रोड डम्पिंग ग्राउंड वर आग लागली की आजूबाजूच्या परिसरात उग्र धुर व उग्र दर्पाने नागरिक हैराण होत आहेत.
विशेष म्हणजे शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही लोकप्रतिनिधी कचरा उचलून देत नाहीत,जर मनपा प्रशासनाने खाजगी वाहनातून कचरा उचलला तर कचरा उचलणाऱ्या कंत्राटी ठेकेदारांच्या गाड्या फोडल्या जातील असा दम काही लोकप्रतिनिधींनी भरला असल्याने शहरात कचरा उचलला जात नसल्याची चर्चा मनपा प्रशासनात सुरू आहे.एकीकडे कचरा समस्या तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी कचरा उचलण्यास केलेली अडकाठी यामुळे ऐन रमझान सणात मनपा प्रशासन प्रचंड अडचणीत आले असून मनपा आयुक्त अजय वैद्य यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे गरजेचे आहे.