पालघर : बारा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोमवारच्या दिवशी महाशिवरात्रीचा योग आल्याने भाविकानी एडवणच्या स्वयंभू असा लौकिक असणाऱ्या शिवमंदिरासह पालघर, शिरगाव, सातपाटी, मुरबे येथील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज पहाटेपासूनच शिवलींगावर दुधासह फुलांचा अभिषेक करून शिवशंभो, भोलेनाथाचा जय जयकार सुरू होता.महाशिवरात्र हा शिवभक्तांसाठी मोठा उत्साहाचा दिवस असतो. त्यातच तब्बल बारा वर्षानंतर सोमवारच्या दिवशीच महाशिवरात्री आल्याने शिवशंभुच्या भक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. सातपाटी, मुरबे, शिरगाव, एडवण, पालघर येथील शिवमंदिरे भक्तांच्या दर्शनासाठी सज्ज झाली होती. आज परिसरातील सर्व मंदिरामध्ये पहाटेपासून भोलेनाथचा गजर सुरू होता. काही मंडळांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. एडवण, शिरगाव, मुरबे येथे रात्री मोठी यात्रा भरली जात असल्याने निरनिराळी करमणुकीची साधने, मिठाई, खेळणी विक्रेते विविध भागातुन येत असल्याने स्थानिकांची आपल्या मुलासह मोठी गर्दी यात्रेमध्ये होत असते. (वार्ताहर) सफाळे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला १६ कि. मी. अंतरावर असलेले व अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एडवण गावी वसलले स्वयंभु शिवमंदिर तालुक्यातील शिवभक्तांसाठी एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. सुमारे शंभर वर्षापुर्वी समुद्राच्या किनाऱ्यावर एक जुने शिवमंदिर होते. या शिवमंदिराच्या जागृतपणाच्या अनेक अनुभव मच्छीमार समाजाला येऊ लागल्यानंतर त्यांनी दर एकादशीच्या दिवशी आपल्या बोटी समुद्रात पाठवून मिळणारे उत्पन्न मंदिरासाठी देण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्या निधीतूनच १९७३ साली एक भव्य असे मंदिर एडवणच्या समुद्र किनाऱ्यावर उभे राहीले. मंदिराच्या तीन्ही बाजुला समुद्रात उभ्या असलेल्या काळाशार खडकावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा व गार वारा यामुळे भक्तांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. मच्छीमार तांडेल बोट ग्रुप सभासदांनी आजही आपले उत्पन्नाचे स्त्रोत्र सुरूच ठेवले असून मंदिराची देखभाल दुरूस्ती, दैनंदिन पुजाअर्चा, महाशिवरात्री उत्सव प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत.
पालघरमध्ये भोलेनाथाचा जयजयकार
By admin | Published: March 08, 2016 1:48 AM