- सदानंद नाईक
उल्हासनगर : वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपासमोर भोंगा बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकार्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करून घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आदींच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, व्हीनस चौकातील पेट्रोल पंपासमोर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करून भोंगा बजाओ आंदोलन केले. देशात महागाईचा आगडोंब उडाला असून नागरिकांत याबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकिच्या धोरणांमुळे देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने सर्व सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले. परंतु केंद्र सरकार महागाई नियंत्रणात आणण्याकरीता कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचा आरोप साळवे यांनी केला. आंदोलनात भोंग्यावर मोदींची जुनी भाषण लावून त्यांनी जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांची यावेळी पोलखोल करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केली.
देशात भोंगे लावून धार्मिक तुष्टीकरण व जाती धर्मात तेढ वाढवण्याचे काम चालू आहे. लोकांच्या हिताच्या व मूळ मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी हे भोंगा लावून आंदोलन करण्यात आल्याचे साळवे म्हणाले. आंदोलनात माजी महापौर मालती करोतीया, किशोर धडके, महादेव शेलार, आशाराम टाक, मुन्ना श्रीवास्तव, प्रा. नारायण गेमनानी, महेश मिरानी, विशाल सोनवणे, योगेश शिंदे, अनिल यादव, राजमोहन नायर, रणजीत साळवे, कमल मिल्कुंदे, गुरिंदर कौर, उषा गिरी, फॅमिदा सय्यद, भारती फुल्वरिया, विद्या शर्मा, संगीता भविस्कर, संतोष साठे, अमित सिंग लबाना, सुलक्षण भालेराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.