नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावांच्या शाश्वत विकासासाठी निश्चित केलेले नऊ गोल साध्य करून ग्रामपंचायतीने देशात पहिला क्रमांक मिळवावा, त्याचबरोबर गावाला सौर पद्धतीने वीज पुरविण्याच्या प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी काल्हेर येथे केले. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत काल्हेर येथे मंजूर झालेल्या २९ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले.या वेळी माजी आमदार योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, जयवंत पाटील, सरपंच शिल्पा भोकरे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीपेक्षा काल्हेरची लोकसंख्या दहा पटीने जास्त आहे.या ग्रामपंचायतीकडून अत्यंत कमी काळात वेगाने विकासकामे करण्यात आली.केंद्र सरकारने निश्चित केलेले शाश्वत विकासाच्या नऊपैकी सहा ते सात गोल काल्हेरवासियांनी साध्य केले.आता उर्वरित गोल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील अव्वल ग्रामपंचायतीचा पुरस्कार स्विकारावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक सूर्य, एक विश्व, एक ग्रिड' धोरण स्विकारले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यास,काल्हेरमधील नागरिकांना स्वस्तात वीज उपलब्ध करता येईल.सध्या वीजेचा प्रति युनिट दर ७ रुपये ६४ पैसे आहे.त्याऐवजी १ रुपया ४६ पैशांत सौर ऊर्जेवरील वीज उपलब्ध होईल.त्यादृष्टीकोनातून ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी सुचना देखील पाटील यांनी केली.
गावाच्या भविष्यासाठी योजनेचे काम दर्जेदार व्हावे, यादृष्टीकोनातून पदाधिकारी, ग्रामस्थ आणि प्रशासनाने सतर्क राहावे असे आवाहन देखील पाटील यांनी केले. काल्हेर गावात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्याच्या दृष्टीकोनातून आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य केंद्रात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून काल्हेरमध्ये स्पोर्ट्स अकादमी मंजूर करण्यात येईल.त्यानुसार गावात खेळांच्या सर्वसुविधा उपलब्ध होतील अशी घोषणा पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"