सदानंद नाईक, उल्हासनगर: अंटेलिया-रिजेन्सी येथील उल्हास नदी घाटाच्या कामाचे भूमिपूजन दिड वर्षांपूर्वी होऊनही काम अर्धवट स्थितीत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी रविवारी घाटाची पाहणी करून कामाला सुरुवात होण्याचे संकेत दिले.
उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारी अंटेलिया-रिजेन्सी येथे घाट बांधण्याची संकल्पना आमदार कुमार आयलानी यांची आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दिड वर्षांपूर्वी कामाचे भूमिपूजन केले. आमदार व शासनाच्या निधीतून घाट कामाला सुरुवात केली. मात्र दिड वर्षात एका भिंतीच्या पुढे काम झाले नसल्याची टीका होत आहे. महापालिका बांधकाम विभागाने शासनाच्या नागरी सुविधा निधी व आमदार निधी अशा एकून १ कोटी ३५ लाख रुपये घाटाच्या कामासाठी मंजूर असल्याची माहिती दिली. मात्र काम संथगतीने सुरू असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. घाटासाठी शासनाकडे १० कोटींची मागणी केल्याची माहिती आमदार आयलानी यांनी दिली आहे.
उल्हास नदी किनारी घाट बांधून त्याठिकाणी नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बेंचेस, स्वच्छतागृह, नदी घाट ठिकाणी वॉचमन रूम, पूजेसाठी सुविधा बांधण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार आयलानी यांनी दिली. प्रत्यक्षात काम संथगतीने सुरू असल्याने, घाटाचे काम कधी होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.