उल्हासनगर : कॅम्प नं-३ हिराघाट येथील पंचशील रस्त्याचे शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते झाले. दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत झाले असून रस्त्याच्या श्रेया साठी दोन्ही गट पुढे सरसावले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील विठ्ठलवाडी हिराघाट परिसरातील प्रभाग क्रं-१० मधून शिवसेनेच्या तिकिटावर राजेंद्र चौधरी, राजेश्री चौधरी, शुभांगी बेहेनवाल व पुष्पा बागुल असे चार नगरसेवक निवडून आले होते. चारही नगरसेवकांनी एकत्र येत त्यांचा प्रत्येकी ५० लाखाचा नगरसेवक निधी असा एकून २ कोटींचा निधी हिराघाट ते पंचशीलनगर रस्ता बांधणीला दिला. २ कोटीच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या निविदाही निघाल्या. दरम्यान शिवसेनेत उभी फूट पडली असून राजेंद्र चौधरी शिवसेना ठाकरे गटात असून ते ठाकरे गटाचे शहरप्रमुख आहेत. तर पुष्पा बागुल व शुभांगी बहेनवाल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे प्रभाग क्रं-१० मध्ये शिंदे-ठाकरे गट आमने-सामने उभे ठाकले.
हिराघाट ते पंचशीलनगर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते व स्थानिक नेत्यांच्या उपस्थित गेल्या आठवड्यात झाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नगरसेवक व शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व माजी नगरसेविका राजेश्री चौधरी यांना बोलाविले नाही. याचा राग येऊन शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व नगरसेविका राजेश्री चौधरी यांनी स्थानिक नागरिकांना एकत्र आणून शनिवारी धुमधडाक्यात रस्त्याचे भूमिपूजन केले. एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेचे दोन्ही गटाचे नेते श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गट आमनेसामने येऊन मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.