डोंबिवली: भोपर गावामध्ये आणि सागाव परिसरातील नागरिकांनी पुन्हा पाणी टंचाईचे फटके जाणवायला लागले आहेत. सणासुदीच्या काळात पाणी न मिळाल्याने गैरसोय होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींसह गावक-यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जाऊन आयुक्त गोविंद बोडके, पाणी पुरवठा अधिकारी राजीव पाठक आदींची भेट घेतली.
पाणी मिळायलाच हवे अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी पाठक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेतून काही भागामध्ये नांदीवली, पीअँडटी कॉलनी, तसेच स्टार कॉलनी आदींसह अन्य भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला. पण तरीही अन्य भागांमध्ये एमआयडीसीच्या कमी दाबाने पाणी सोडण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवापासून पाणी मिळत नसल्याने काय करायचे? त्यानंतर नवरात्री, दसरा, आणि आता तोंडावर दिवाळी आली तरी पाणी मिळत नाही हे योग्य नाही अशी संतप्त भावना रहिवाश्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राजीव पाठक म्हणाले की, रहिवासी, लोकप्रतिनिधी अमर माळी आदी बुधवारी भेटण्यासाठी आले होते. त्यांना वस्तूस्थिती स्पष्ट केली. अमृत योजनेच्या माध्यमाने भोपर गावात काम सुरू झाले असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी दिड महिना अवधी लागणार आहे. तो पर्यंत मात्र पाणी टंचाईची समस्या भेडसावणार आहे. मात्र एमआयडीसीने पाणी चांगल्या दाबाने सोडल्यास पुरवठा देखिल चांगला होईल, काही दिवसांपासून पाणी कपातीचा निर्णय आल्यामुळे एमआयडीसीही नियमाचे पालन करत कमी दाबाने पाणी सोडत असल्याचे समजले. त्यामुळे त्यासंदर्भात संबंधित अधिका-यांना तातडीने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात पत्र पाठवल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. अधिका-यांच्या मतांशी सहमत असून पाणी समस्या तातडीने मार्गी लागावी एवढीच अपेक्षा असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.