लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त गुरुवारी महाजनवाडी ते चेणे परिसरातील १० काँक्रीट रस्ते व २ चौकांचे सुशोभीकरण अश्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले . रस्ते विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या हायवे पट्ट्यातील प्रभाग १४ मध्ये रस्त्यां साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीए कडून हा निधी मंजूर केला असून निविदा प्रक्रिया झाली असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
हायवेपट्ट्यातील प्रभाग १४ मध्ये लोकसंख्या दाट असली तरी महापालिकेकडून आतापर्यंत विकासाची कामे झालेली नाहीत. मूलभूत सोयी सुविधाही येथील नागरिकांना मिळत नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे. आजही येथे चांगले व दर्जेदार रस्ते नाहीत. त्यामुळे या भागातील रस्त्यांसाठी निधी दिला जावा अशी मागणी आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आ. सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 'एमएमआरडीए'कडून या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला. त्यामुळे आता याच वर्षात प्रभाग १४ मध्ये सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर शहराला भरभरून दिले आहे. मीरा भाईंदरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी शिंदे - फडणवीस सरकारने दिला असून विकासाचा मार्ग प्रशस्त केला आहे. आम्ही काम करीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकासासाठी प्रेरणा मिळत असते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे , असे आ. सरनाईक यांनी सांगितले. रस्त्याची कामे करण्यासाठी ठेकेदारांना दोन दिवसात कार्यादेश दिले जाणार असून प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे.
आदिवासी पाडे, झोपडपट्टी, बैठी घरे या हायवे पट्ट्यात , विशेषतः या १४ नंबरच्या प्रभागात आहेत. मुंबईच्या वेशीवर दहिसर टोलनाका , हायवे बाजूला असून महापालिकेने आतापर्यंत या प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने राज्य सरकारकडून या प्रभागाच्या विकासासाठी निधी आणला आहे. या प्रभागात स्थानिक भूमिपुत्र आदिवासी, आगरी, कोळी बांधवही राहतात. तसेच गरिबांची घरे , बैठ्या चाळी सुद्धा आहेत. येथे लोकसंख्या वाढली तरी येथे रस्ते , पिण्याचे पाणी अशा व इतर नागरी समस्या आहेतच. शहरातील इतर भागाप्रमाणेच या प्रभागातही चांगले रस्ते तयार केले जावेत म्हणून रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी आणला आहे.
चेना , वर्सोवा, काजू पाडा , माशाचा पाडा , काशिमीरा , ठाकूर मॉलपर्यंत विस्तारलेल्या या प्रभागात महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आमच्या प्रभागाचा विकास झाला नाही , पण आमदार सरनाईक यांनी १०० कोटी निधी रस्त्यासाठी आणून कामास सुरवात झाल्याने चांगले रस्ते मिळणार आहेतअसे उपशहरप्रमुख रामभवन शर्मा, ऍड. बाबासाहेब बंडे, कमलाकर पाटील, उपशहरसंघटक संगीता खुणे, आशा शेट्टी, विभागप्रमुख शिवाजी पानमंद आदींसह नागरिकांनी बोलून दाखवले .
यावेळी महापालिका आयुक्त दिलीप ढोले, जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हासंघटक निशा नार्वेकर, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर व महिला संघटक पूजा आमगावकर, मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंह, माजी नगरसेवक कमलेश भोईर व परशुराम म्हात्रे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मंगेश चीवटे आदी उपस्थित होते .
नवीन केल्या जाणाऱ्या रस्त्यांची नावे:-
१) निलकमल नाका ते मनाली विलेज
२) जरी मरी ते अग्रवाल ग्रीन विलेज
३) राष्ट्रीय महामार्ग क्र.८ आर.के. इन ते अग्रवाल विलेज नाला
४) पठाण चौक ते वेस्टर्न पार्क नाला
५) जरी मरी मंदिर, राज इस्टेट बिल्डींग ते हॉटेल सफारी
६) साई पॅलेस हॉटेल ते मिनाक्षी नगर- आबिद कॉलेज पर्यंत ३० मिटर रुंद डीपी रस्त्याचे बांधकाम
७) सफारी हॉटेल ते राज इस्टेट पर्यंत डीपी रस्त्याचे बांधकाम
८) महाजनवाडी, महाविश्णु मंदिर ते साई मंदिर पर्यंत रस्त्याचे बांधकाम
९) सहयाद्री हाॅटेल ते वर्सोवा गाव पर्यंत रस्त्याचे बांधकाम
१०) हिल व्हयु हॉटेल चेना ते जे कुमार चेना येथील दोन जंक्शन सुषोभिकरण तसेच पदपथ सह १२ मिटर वा १८ मिटर रस्त्याचा विकास.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"