डोंबिवली : कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांना वेगाने दिल्लीला पोहोचण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण रेल्वे स्थानकात उत्साहात स्वागत करण्यात आले. खासदार कपिल पाटील यांनी या मार्गे राजधानी सुरी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार सुरू झालेली गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पहिल्या पाच तासात वेटींगवर जाणा-या या गाडीचा दर आठवड्याला दोन वेळा सुटणारी गाडी दररोज सोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून सुरू झाली. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कल्याणमध्ये दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास दाखल झाली. या गाडीचे भाजपा कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. कल्याणच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, महापालिकेतील गटनेते वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, परिवहन समितीचे सदस्य कल्पेश जोशी, भिवंडी तालुका सरचिटणीस राम माळी, युवा नेते नितीन कारभारी, ठाणे विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभा पाध्ये आदी उपस्थित होते.
कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी किमान २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक गाडयांना तब्बल ३० तासांहून अधिक वेळ जातो. त्यातून प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी अनेक प्रवाशी मुंबई सेंट्रलहून दिल्लीला जाणा-या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करतात. त्यांना कल्याणहून पोचण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमार्गावरही राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी प्रयत्न सुरू केला होता. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. या गाडीने कल्याणहून दिल्लीत अवघ्या १८ तास ४२ मिनिटांत पोचता येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोनमेंट थांबे देण्यात आले आहेत. दर बुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी राजधानी एक्स्प्रेस सुटणार आहे. ती दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी कल्याणमध्ये पोचेल. तर दुस-या दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गाडी दिल्लीत पोहोचणार आहे.