- जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाण्यात दररोज शिवसेनेवर हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड कळवा-मुंब्रा या त्यांच्या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांच्या आधारे महापालिका निवडणुकीत मते मागत आहेत. पायी फिरून गेल्या काही दिवसांत त्यांनी हा परिसर अक्षरश: पिंजून काढला आहे.अविरत मेहनत, दिवसरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ आणि थेट जनतेशी संवाद, या त्रिसूत्रीवरच आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात दररोज पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आव्हाड आपल्या बालेकिल्ल्यात विरोधकांवर टीका करीत नसून विकासावर मते मागत आहेत, हेच शनिवारी त्यांच्या प्रचार दौऱ्यात जाणवले.शनिवारी पहाटे साडेतीन वाजता प्रचार करून आलेल्या आव्हाड यांची साडेसात वाजता दिवाणखान्यात एण्ट्री झाली. लागलीच त्यांची गाडी मुंब्य्राच्या दिशेने पळू लागली...अक्सा मशीद रोडवर कार्यकर्ते त्यांची वाट पाहत उभे असतात. राष्ट्रवादीचे ठाणे शहर उपाध्यक्ष रफीक शेख, विजय देसाई त्यांना भेटतात. गाडी थांबताच त्यांना नागरिकांचा गराडा पडतो. आपले नेते शरद पवार यांच्याप्रमाणेच ते कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी नावे घेऊन संवाद करतात. तेवढ्यात, एक ज्येष्ठ नागरिक पुढे येतो. ‘हाथी चले अपनी चाल, चाहे कुत्ते कितने भोकते रहे’, असे उद्गार काढतो. आव्हाडांची कळी खुलते, ते त्याचा हात घट्ट पकडून हस्तांदोलन करतात. तोपर्यंत, कॉर्नर मीटिंगची जीपही तिथे पोहोचलेली असते. मग, घासवाला कॉम्प्लेक्समध्ये सकाळी १० वा. प्रचार सुरू होतो. ‘मै जितेंद्र आव्हाड.. आपके दरवाजे के निचे रुबरू करने के लिए आया हूँ. मै विकास के लिए मत माँग रहा हूँ. मै सपने नहीं दिखाता, वादे नहीं करता. काम और विकास कर रहा हूँ.’ मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात कसा कायापालट केला, याचा पाढा ते वाचतात. पूर्वी वीजभारनियमन व्हायचे, रस्ते खराब होते. आता ही परिस्थिती कशी बदलली, हे सिमेंटच्या रस्त्याकडे बोट दाखवत सांगतात. हिंदू-मुस्लिम नव्हे, माणुसकीचे नाते जोडण्यासाठी आलोय,’ असे भावनिक आवाहन करतात. भाषण संपल्यावर जवळ आलेल्यांना ‘थोडा काम किया है, और बहोत कुछ बाकी है’, असे सांगत मग ‘खुदा हाफीज’ करतात.कौसा भागातील डोंगरेनगर, तन्वर कॉम्प्लेक्स, ओल्ड नशेमन कॉलनी आणि आझादनगर येथील खडी मशीन रोडपर्यंत ते प्रचार करतात. मध्येच एखादी विद्यार्थिनी आव्हाडांसोबत सेल्फी काढून घेते, तर एखादी महिला रस्त्यावरील बेशिस्तीची तक्रार करते. आव्हाड शांतपणे सारे ऐकून घेतात. फोनवरून तक्रारी संबंधितांच्या कानांवर घालतात. तेवढ्यात, तन्वर कॉम्प्लेक्स येते. दोन दिवसांपूर्वी येथील पाणीटंचाईबाबत त्यांनी बैठक घेतलेली होती. ‘आता पाणी येते का?’ असा सवाल इमारतीच्या खालूनच आव्हाड करतात आणि खिडक्या, गॅलरीमधील महिला जोरात होकार भरतात. तेवढ्यात, एक कार्यकर्ता धावत येतो आणि विरोधक तुमच्याबद्दल अपप्रचार करीत असल्याचे सांगतो. आव्हाड त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात. ‘जिनकोसामने हार दिखाई देती हैं, वही अफवाए फैलाते हैं. छोड दो...’ त्यांच्या या उत्तराने त्याचे समाधान होते व तो हसतो...मतदानाचे दाखवले प्रात्यक्षिक- मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही नाका कामगार महिला मोठ्या संख्येने असतात. त्या त्यांच्या समस्या सांगतात. त्या नगरसेवकांनी सोडवायच्या समस्या असल्या तरी आव्हाड शांतपणे ऐकून घेतात.- मुंब्रा स्थानकाचा कसा कायापालट केला, याची आठवण करून देत ते त्यांच्या सर्व समस्यांची उत्तरे देतात. लागलीच नाका कामगार शांत होतात. मग, निवडणुकीत मतदान कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक आव्हाड साऱ्यांना दाखवतात. - प्रचारामुळे कितीही उशिरा झोपलो, तरी सकाळी ८ वाजता दिवस सुरू होतो. निवडणुकीच्या धबडग्यातही जिम सुरू आहे. १८ ते १९ तास काम सुरू असल्याचे ते सांगतात. दुपारची झोप घेता का, असे विचारल्यावर छे...छे... दुपारची झोपबिप मी कधीच घेत नाही, असं ते उडवून लावतात. कौसा भागातील सभेसाठी निघालेले आव्हाड रफिक चाचांशी संवाद साधतात. एका कार्यकर्त्याला मतदारांशी संवाद कसा साधायचा, याचा कानमंत्र देतात. स्टेजवरून कोणीही अपशब्द वापरू नका, असे आवाहनही ते करतात.