जव्हार : जव्हार-मोखाडा तालुक्यांना काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले होते, तर मागील दोन ते तीन दिवसांपासून खेडोपाड्यात काही ठिकाणी पावसाच्या धारा पडत आहेत. यामुळे हळव्या वाणातील कापणी केलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हातात आलेले पीक वाया जात असल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.हळव्या वाणातील भातपिके कापणीस तयार झाली आहेत. ठिकठिकाणी पिवळ्या सोन्यावाणी शेती बहरली आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवातही केली आहे. मात्र, कापणी केलेल्या या पिवळ्या सोन्याला घरी आणण्यापूर्वीच परतीच्या पावसाने दरोडा टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर कुजून जाताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.कोरोनाचा धोका पत्करून व टाळेबंदीचा सामना करून येथील शेतकºयांनी मोठ्या मेहनतीने या वर्षी भाताची लागवड केली आहे. अगदी सोन्यावाणी भात पिकून आले आहे. वेळीच या भाताची कापणी केली तर या भाताचा चांगला तांदूळ तयार करता येईल. अन्यथा जास्त दिवस शेतातच राहिले तर ते शेतात गळून जाईल, अशी भीती शेतकºयांना असल्याने शेतकºयांनी कापणी सुरू केली आहे.मात्र कापणी केलेल्या भाताचे कडपे रोजच संध्याकाळी कोसळत असलेल्या पावसाने भिजत आहेत. काही ठिकाणी कडपे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने कुजून जावून भाताच्या कणसांना मोड येऊ लागले आहेत.दरम्यान, आॅगस्ट महिन्यातही अतिवृष्टीमुळे जवळपास ३९७.३५ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत. या नुकसानीत भात १५७.६४ तर नागली २३९.७१ हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जव्हार तहसीलदार बाळा भला यांनीदिली आहे.
शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:11 AM