ठाणे (भिवंडी) - ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. (Big blow to Shiv Sena in Bhiwandi; Suresh Mhatre's Resignation of membership of ZP)
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. सेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर आपले वैयक्तिक कारण सांगत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना सदस्यत्वाचा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेस सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरु आहे. त्याचबरोबर आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.