ठाणे :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलीच होतील, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे पक्ष बांधणीसाठी आणि जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता अधिक तत्परतेने कामाला लागा, असा कानमंत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला. लोकांर्पयत जा, पक्ष संघटना मजबूत करा, असेही ते म्हणाले. मनसेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहात राज यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना स्फूरण चढावे या उद्देशाने राज एका महिन्यात दोन वेळा ठाण्यात आल्याने ठाण्यात सध्या शिवसेनेत दोन गट झाल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी मनसेने आधीच व्यूव्हरचना केली आहे. दोघांतील भांडणात मतदारांसमोर सक्षम पर्याय देण्याचा विचार मनसेकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांनी ठाण्याकडे विशेष लक्ष दिले आहे.
पदाधिकाऱ्यांनादेखील यामुळे बळ मिळाले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत. यावेळी त्यांनी विभागप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेतला.