ठाणे - ठाण्यातील येऊर येथील जंगलास मंगळवारी सायंकाळी आग लागली. वन विभागाच्या जवळपास पाच तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे जवळपास दीड ते दोन एकर परिसरातील वनसंपदेची हानी झाली.येऊर येथील जंगलामध्ये मामा भाच्याचा डोंगर आहे. या डोंगरावरील झाडांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. वनपाल सुजय कोळी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्यांनी आग मिटविण्यासाठी परिश्रम घेतले. रात्री 10 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती ठाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अर्जुन निचिते यांनी दिली. रविवारी याच जंगलात मानपाडा येथील भागामध्ये आग लागली होती. दरम्यान, भाईंदर पाड्यातील नागला बंदर जवळ असलेल्या आणखी एका जंगलास मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
ठाण्यातील येऊर जंगलात मोठी आग, पाच तासानंतर आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:58 PM