शाम धुमाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा |
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. पोलिसांनी आज नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली असून वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथक व टीमकडून पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तपासणीदरम्यान ५ कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. त्यानंतर आता शहापूर तालुक्यात २ कोटी रुपयांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली असून ही रक्कम नक्की कोणाची आहे, याबाबत अधिक तपास केला जात आहे.