लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर पूर्व येथील मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाड मुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी ते भगदाड दगड लावून तात्पुरते झाकले . परंतु अपघाताची भीती कायम असल्याने नंतर खडी टाकून खड्डा तूर्तास भरण्यात आला आहे . ह्या भगदाड मुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराची लक्तरे पुन्हा फडकू लागली आहेत .
भाईंदर पूर्वेस स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ह्या मुख्य नाक्या पासून भाईंदर पूर्व फाटक कडे येणारा वर्दळीचा मुख्य रस्ता आहे . सदर डांबरी रस्त्याच्या फाटक कडे येणाऱ्या मार्गिकेवर डांबरी रस्ता तुटून भगदाड पडले . दिवसरात्र ह्या रस्त्यावर वाहने धावत असल्याने वाहन चालकांना हा खड्डा चुकवून वाहन चालवणे अतिशय जोखमीचे झाले आहे . येथून पादचाऱ्यांची ये - जा असल्याने त्यानं या सुद्धा जीव मुठीत ठेऊन रस्त्यावरचे वाहन आणि खड्डा वाचवून चालावे लागतेय . ह्या महत्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावरच भगदाड पडल्याने नागरिकां मध्ये महापालिकेच्या कामाच्या दर्जा बाबत संताप व्यक्त होत आहे .
डांबरी रस्त्याला पडलेले भगदाड पहिले असता रस्त्यावर डांबर काम करताना डांबर व खडी आदी पुरेशी टाकलीच नाही असे दिसते . कारण भगदाड पडले आहे त्या ठिकाणी खाली गटाराचा तुटका स्लॅब, सळ्या व खाली खड्डा तसेच केबल दिसत आहे . सदर प्रकार वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यावर सहायक निरीक्षक मंगेश कड व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या भगदाडवर मोठा दगड ठेवला आहे . परंतु वाहनांची वर्दळ व वेग पाहता हा खड्डा धोकादायक ठरू शकतो असे वाहन चालकांनी म्हटले आहे .
शुभम साळस्कर ( नागरिक ) - भर रस्त्यावर पडलेले हे भगदाड पहिले कि महापालिका जनतेच्या पैशातून निकृष्ट कामे करून जनतेच्याच जीवाशी खेळत आहे . परंतु ह्यावर कोणी नगरसेवक व नेता अवाक्षर काढत नाही. जनतेसाठी निकृष्ट रस्ते व ह्यांचे मात्र आलिशान इमले अशी गेल्या काही वर्षात शहराची अवस्था झाली आहे .
मंगेश कड ( सहायक निरीक्षक , वाहतूक पोलीस ) - रस्त्या खाली गटार असून केबल गेल्या आहेत . तेथे खड्डा पडल्याने अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी दगड लावले व मेट्रोचे काम करणार ठेकेदार जे . कुमार , महापालिका व अदानी वीज कंपनीस कळवले . आता त्या ठिकाणी खडी टाकून खड्डा भरला आहे .