अनिकेत घमंडी
डोंबिवली : ‘स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली’, यासाठी केडीएमसी प्रयत्नशील आहे. पण, त्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट येथून चित्रकलेत पदवी घेतलेल्या शहरातील वैभव जगताप याने भारतीय क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली याच्या विविध छटांचे भित्तीचित्र रेखाटून त्याच्या विराट कार्याला सलामी दिली आहे.
वैभव याला हे चित्र साकारण्यासाठी रोटरी क्लब आॅफ डोंबिवली क्राउन सिटीचे सचिव विनायक गुर्जर यांनी साधनसामग्री आणि जागा उपलब्ध करून दिली. यासंदर्भात गुर्जर व वैभव यांनी सांगितले की, सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू आहेत. शहरात मैदानांचा अभाव असला तरी बहुतांश घरांमधील लहानगे क्रिकेटप्रेमी बॅटबॉल घेऊन गल्ली क्रिकेट खेळताना दिसतात. त्यातच आबालवृद्धांमध्ये आधीच्या काही दशकांमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर तर आता या दशकामध्ये कॅप्टन विराट कोहली यांचे चाहते सर्वाधिक असल्याचे आढळून येतात. नेमका हाच धागा पकडून लहानग्यांमधील कोहलीचे आकर्षण न्याहाळून वैभव यांनी विराट कोहलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे भित्तीचित्र रेखाटण्याचा संकल्प केला. त्यानुसार, गुर्जर यांनी स्वत: राहत असलेल्या भागशाळा मैदानानजीकच्या कर्वे रस्त्यावरील देवकी निवास या सोसायटीच्या बाहेरील भिंतीवर चित्र काढण्यास सांगितले. इतक्या सहज संकल्प साकारण्यासाठी जागा मिळाल्याने वैभव यांना आनंद झाला. बुधवारी रात्रीच त्यांनी कामाला सुरुवात केली. आधी भिंत साफ करण्यासाठी काही तास लागले. पहाटे ४ पर्यंत साफसफाई आणि कोहलीच्या विविध पैलूंचे कच्चे आराखडे पांढऱ्या खडूने रेखाटण्यात आले. त्यानंतर, एकेक करून चित्र रंगवायला घेतले. नंतर काही वेळ विश्रांती घेऊन गुरुवार सकाळपासून सायंकाळी ६.३० पर्यंत प्रत्यक्ष कोहलीचे चित्र साकारण्यात आल्याचे समाधान वैभव यांना मिळाले. दिवसभर ते चित्र साकारत असल्याचे बघून परिसरातील लहानग्यांनीही अन्य भिंतींवर चित्र काढण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यांच्या परिने चित्र काढण्यात यश आले, तर काहींचे प्रयत्न सुरूच होते.कोहलीचे हे चित्र साकारण्यासाठी वैभव यांना पिवळा, काळा, निळा, भगवा, असे साधारण पाच किलो रंग लागले. चांगल्या दर्जाचे ब्रश, खडू असे साहित्य गुर्जर यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे वैभव यांनी रोटरीचे आभार मानले. तसेच साधारण १० तासांमध्ये कोहलीचे चित्र काढून एक संकल्पपूर्तीचा अनुभव मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. शहरांमधील विविध ठिकाणच्या भिंती अन्य चित्रांनी रंगवून शहर सुशोभित करण्याचा वैभव यांचा मानस आहे. दरम्यान, गुर्जर यांनी सांगितले की, आबालवृद्धांनी यामधून प्रेरणा घ्यावी, हा यामागचा उद्देश होता. लहानग्यांनी लगेच इमारतीच्या अन्यत्र भिंतीवर चित्र काढायला सुरुवात केली. भलेही पब्जी काढले असले, तरी त्यांना जे भावते ते त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, याचे समाधान जास्त आहे.रेल्वेस्थानकात करणार सुशोभीकरणवैभव यांच्या टीमसमवेत शुक्रवारपासून डोंबिवली रेल्वेस्थानकातही सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी, सामाजिक संदेश देण्याचे काम रोटरी क्लब आॅफ क्राउन सिटीअंतर्गत करण्यात येणार आहे. त्याला नागरिकांनी प्रोत्साहन द्यावे आणि शहर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.