नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील अनेक ठिकाणी विषारी व बिनविषारी साप आढळत असतांनाच आता चक्क भिवंडी मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातच मोठा साप आढळून आला आहे. रविवारी रात्री हा साप आयुक्तांच्या बंगल्यात शिरल्याचे लक्षात आले. त्यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख हे बंगल्यातच हजर होते. त्यामुळे, त्यांनी तात्काळ अग्निशमन दलास याबबात माहिती दिली.
मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे टीम लीडर लिडींग फायरमन नितीन चव्हाण, फायरमन कांतीलाल गुजर, सुभाष सस्ते यांनी तो साप पकडून मुंबई नाशिक महामार्गवरील निर्मनुष्य ठिकाणी जंगलात सोडून दिला. या सापाची लांबी सुमारे सहा फुटांहून अधिक होती. अग्निशमनच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. तसेच, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कामाची प्रशंसा केली.