मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. नशेसाठी तो दुचाकी चोरत होता व त्याने केलेले ९ गुन्हे उघडकीस आणून १० दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे , सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे सह संतोष चव्हाण, राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, अविनाश गर्जे, प्रफुल्ल पाटील, विकास यादव आदींच्या पथकाने दुचाकी चोरांचा शोध सुरु केला .
तपास करीत असताना मिळालेल्या तांत्रीक माहितीचे विश्वलेषण करुन तसेच पो. हवा. समिर यादव यांना गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विघ्नेश उदय मिश्रा (२३) रा . जुपीटर बिल्डींग, दिपक हॉस्पीटल जवळ, मीरारोड ह्याला ताब्यात घेतले . त्याच्या कडे चौकशी केली असता काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल राजेश जैन यांची दुचाकी चोरी त्याने केल्याचे निष्पन्न झाले .
त्याला अटक करून पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ४ , मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत २ तर नवघर व तुळींज आणि मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ९ दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले . पोलिसांनी त्याच्या कडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या असून त्याची किंमत ४ लाख २० हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले .