---------------------
दांडक्यांनी मारहाण
डोंबिवली : ‘माझ्या भावाचे नाव मामाला सांगतो का?’ असा सवाल करीत देवीदास जाधव यांना आलोक त्रिभुवन, आदेश त्रिभुवन, संजय जाधव, मनोज जाधव आदींनी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता निळजे गावात घडली. जाधव यांच्यासोबत असलेले मयूर सोनवणे, समीर सोनवणे आणि रोशन गायकवाड यांनाही मारहाण केली गेली आहे. मनोज जाधव यांनीही तक्रार दिली असून मयूर सोनवणे, समीर सोनवणे, देवीदास जाधव आणि रोशन गायकवाड आदींनी त्यांना आणि बहिणीला मारहाण केल्याचे त्यात म्हटले आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून आठ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
------------------------
बांधकाम साहित्याची चोरी
डोंबिवली : खोणी पलावा सेक्टर ४ मधील मारवेला बिल्डिंगच्या आवारात उघड्यावर ठेवलेले मायवान ॲल्युमिनिअमचे तुकडे आदी बांधकाम साहित्य चोरी करून नेत असल्याच्या आरोपाखाली अजय यादव, कमलेश चौहान आणि घनश्याम यादव यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रमेश आव्हाड यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
---------------
‘महिला लाभार्थ्यांचा त्रास थांबवा’
कल्याण : विधवा, निराधार, अपंग पात्र अनुदान योजना लाभधारकांना कल्याण तहसीलदार, सेतू कार्यालयामार्फत एका दिवसात दाखले देण्यात यावेत. महिला लाभार्थ्यांना वारंवार होणारा त्रास तत्काळ थांबवावा, अशी मागणी भाजप, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कल्याण जिल्हा संयोजिका ॲड. शिल्पा राम, भाजप प्रदेश पदाधिकारी डॉ. राजू राम यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे.
-------------------------------------------------
‘सक्षम अधिकारी नेमा’
डोंबिवली : शहरात वाहतूक विभागासाठी सक्षम वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तत्काळ नियुक्ती करावी, असे पत्र वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांना बहुजन विकास आघाडीच्या डोंबिवली शहरातर्फे देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांची बदली होऊन अनेक दिवसांचा कालावधी लोटला आहे. संबंधित विभागाचा अतिरिक्त कार्यभार महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे यांच्याकडे दिला आहे. डोंबिवलीत वाहतूककोंडीची समस्या दिवसागणिक जटिल बनत आहे. कोंडीच्या त्रसातून डोंबिवलीकरांची मुक्तता करावी, अशी मागणी पत्रात केली आहे.
-----------