मुरबाड : तालुक्यातील महावितरण कंपनीच्या भाेंगळ कारभाराचा फटका शिवळे गावातील एका निराधार विधवा महिलेला बसला आहे. या महिलेने महावितरणकडून ९ महिन्यांपूर्वी मीटरसाठी पैसे भरले आहेत. मात्र, तिला अद्याप मीटर मिळालेले नसतानाही ऑगस्टमध्ये थेट १२०० रुपयांचे बिल पाठवून धक्का दिला आहे. या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिवळे येथील संगीता सुखदेव जाधव या विधवा महिलेला शासनाने घरकुल याेजनेद्वारे घर दिले आहे, तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना माेफत विजेचे मीटर देते. मात्र, या याेजनेचा लाभ कसा मिळवायचा हे माहीत नसल्यामुळे तिने जानेवारीत २०२१ मध्ये एका वायरमनला विनवणी करून तीन हजार रुपये दिले. मात्र तेव्हापासून आठ महिने उलटूनही या महिलेच्या घरी वीज मीटर बसलेले नाही. त्यामुळे तिला अंधारात राहावे लागत आहे. मात्र, २८ ऑगस्ट २०२१ या तारखेचे १२०० रुपयांचे बिल पाठविल्याने तिला धक्का बसला आहे. तिने मीटरसाठी दिलेल्या तीन हजार रुपयांची पावतीही तिच्याकडे नाही. त्यामुळे ती आता वीज कार्यालयात हेलपाटे मारत असून, तिची काेणीच व्यथा ऐकून घेत नसल्यामुळे महावितरणच्या कारभाराविराेधात नाराजी व्यक्त केली जात आहे़
काेट
महिलेने पैसे भरले असून, तिला २५ मे रोजी मीटर दिलेले आहे. मात्र, ते मीटर कुठे गेले, तसेच मीटर न देता वीज बिल कसे दिले, याबाबत तेथील शाखा अभियंता राजेंद्र शिर्के यांना लेखी आदेश देऊन त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल.
- विवेक सिंगलवार, उपअभियंता, महावितरण, मुरबाड