कल्याण : कल्याणनजीकच्या नेवाळी परिसरातील भारतीय नौदलाच्या जागेवर बेकायदा चाळी बांधून पैसे उकळून अनेकांची फसवणूक करणारा आणि गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या आरोपीला सात वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याची कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊनही आरोपी न्यायालयात हजर होत नव्हता. स्थानिक महात्मा फुले चौक पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. माजीदअली ऊर्फ गुड्डू मन्सुरअली शेख असे त्याचे नाव असून, त्याच्याविरोधात २०१४ ला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
घाटकोपरमधील कामराजनगर, हिंदुस्थान चाळ येथे राहणारा माजीदअली हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. या गुन्ह्यात सात आरोपी होते; तर, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील अन्य एका आरोपीला तीन वर्षे आणि दुसऱ्या आरोपीला पाच वर्षे कैद, अशी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाने फरार आरोपी माजीदअली याचा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील पावणेदोन कोटी रुपयांचा बंगला जप्त करून लिलावाचे आदेश दिले. त्यानंतरही आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला नाही.
नवी मुंबईतील कामोठे परिसरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये माजीदअली लपून बसल्याची माहिती खबऱ्यामार्फत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि भूषण दायमा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या इमारतीत घुसून फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या माजीदअली याला अटक केली. त्याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
उत्तर प्रदेशातही गुन्हा
२०१६ ला उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस ठाण्यातही त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याबाबतचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यातही तो फरार होता, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे.
----------------------------------