उल्हासनगर : बिलाच्या मुद्यावरून उल्हासनगर महापालिकेतील शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यात चांगलीच जुंपली. याप्रकरणी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे तक्रार गेली आहे. यानिमित्ताने बिलाची टक्केवारी व वाढीव बिलाची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.उल्हासनगर महापालिका डबघाईला आली आहे. हे लक्षात आल्यावर तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आॅक्टोबरपासून नवीन कामाचे आदेश देण्यास बे्रक लावला. सहा महिन्यांपासून अत्यावश्यक कामाशिवाय दुसऱ्या कामाचे आदेश निघत नाही. बांधकाम विभागाचा कारभार ठप्प पडला आहे. आयुक्तांनी थकीत कंत्राटदारांची देणी टप्प्याटप्प्याने दिल्याने पालिकेवरचा भार कमी झाला. विभागाच्या एका लिपिकाने इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने १० लाखांपेक्षा कमी किमतीची तब्बल २५ ते ३० बिले कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्या सहीने लेखा विभागाला पाठवली. याची तक्रार शहर अभियंता रामप्रसाद जैस्वाल यांनी आयुक्तांकडे केली.जैस्वाल यांना विश्वासात न घेता कामाची बिले परस्पर लेखा विभागाला पाठवली. याचा राग जैस्वाल यांना आला. त्यांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केली. विकासकामाच्या बिलावर माझी सही न घेता, परस्पर लेखा विभागाला पाठवल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. यापैकी कोणती कामे झाली, बिले किती किमतीची, आदी माहिती हवी की नको, असा प्रश्न त्यांनी आयुक्तांना केला. आयुक्तांनी संबंधित लिपिकाला बिले घेऊन येण्यास सांगितले. आयुक्त कारवाई करणार, या भीतीपोटी तो सुटीवर गेला. नियमानुसार १० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या बिलावर शहर अभियंता, तर त्यापेक्षा कमी बिलावर कार्यकारी अभियंता यांची सही आवश्यक आहे. मग, सहीवरून वाद का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. (प्रतिनिधी)
बिलावरून अभियंत्यांमध्ये जुंपली
By admin | Published: April 27, 2017 11:53 PM