डोंबिवली : घरफोडीच्या गुन्ह्यातील सूरज चव्हाण या सराईत चोरट्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ठाकुर्लीतील ९० फुटी रोडवर पोलिसांनी गस्ती दरम्यान संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता दोन महागडे मोबाईल त्याच्याकडे आढळले. पडताळणी केली असता ते एका मोबाईल शॉपच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्याला अटक केली असता त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
२८ ऑगस्टला मध्यरात्री आगरकर रोडवर महावीर नॉव्हेल्टी मोबाईल शॉपचे टाळे तोडून चोरट्यांनी सात महागडे मोबाईल आणि रोकड, असा ९७ हजार ५६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलीस हवालदार शंकर निवळे, पोलीस नाईक विशाल वाघ, गणेश गीते, सोमनाथ पिचड, दिलीप कोती, वैजीनाथ रावखंडे, जालिंदर साळुंखे, नीलेश पाटील आदी ९० फुटी रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना एकजण संशयितरित्या आढळला. तेव्हा त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल सापडले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच आगरकर रोडवरील मोबाईल शॉपमध्ये घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली.
मुंबईत चोरीचे १६ गुन्हे दाखल
- पुढच्या तपासात त्याच्याकडून डोंबिवली ठाणे, कल्याण, मुंबई येथील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात रामनगर पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पाच मोबाईल, टीव्ही, रोकड असा एक लाख ७ हजार २६९ रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंबईत त्याच्याविरोधात चोरीचे १६ गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.
वयाच्या १२व्या वर्षापासून करतोय गुन्हे
- चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून, मुंबईतून तो काही वर्षे तडिपार होता. तो सध्या खडवली येथे वास्तव्याला होता. घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत असलेला सुरज हा वयाच्या १२व्या वर्षापासून चोरीचे गुन्हे करीत आहे. तो रेकी करून घरफोडी करायचा. त्याने आणखीन किती गुन्हे केले आहेत, याचा तपास सुरू आहे. त्याला ४ सप्टेंबरपर्यंत कल्याण जिल्हा सत्रन्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मोरे यांनी दिली.
----------------------